मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबई उच्च न्यायालयाने आज मराठा आंदोलनाचे मनोज जरांगे पाटील यांना पूर्वपरवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शन करण्यास मनाई केली आहे. अधिका-यांच्या परवानगीशिवाय शहरातील प्रमुख ठिकाणी निदर्शने करता येणार नाहीत असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. त्याचवेळी जरांगे यांनी निदर्शने करण्यासाठी खारघर किंवा नवी मुंबई सारखी पर्यायी जागा उपलब्ध करुन देणे महाराष्ट्र सरकारसाठी खुले आहे असे खंडपीठाने नमूद केले. मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये यादृष्टीने मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहे.
या निर्णयानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, ते म्हणाले की, आम्ही कायदा संविधानाचे सगळे नियम पाळून आंदोलन करु, आम्ही मुंबईत १०० टक्के जाणार, न्यायदेवतेच्या निर्दशनाचे पालन करु, कोर्टाच्या नियमाचं उल्लंघन करणार नाही, आमचे वकील बांधव कोर्टात जातील, न्यायदेवता न्याय देईल असे ते म्हणाले.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या स्वीय सहाय्यकांकडून मोर्चा रोखण्यासाठी आज प्रयत्न करण्यात आले. स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात आले. पण, मनोज जरांगे पाटील मोर्चावर ठाम आहेत.