इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मराठा मोर्चा आणि आरक्षणाबाबत सर्व गोष्टींची उत्तरं एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मनोज जरांगे परत का आले याचंही उत्तर एकनाथ शिंदेंना विचारा. जेव्हा एकनाथ शिंदे येतील तेव्हा त्यांना विचारा अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे दौ-यावर असतांना दिली. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी यावर प्रत्त्युत्तर दिले आहे. जरांगे पाटील म्हणाले की, कधीपर्यंत भाजपची री ओढणार आहात..स्वत.च पोरगं निवडणुकीत पाडलं..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला संपवून टाकतील अशा शब्दात राज ठाकरेंवर टीका केली.
जरांगे पुढे म्हणाले की, तुम्हाला आम्ही काही विचारलं का..मग तुम्ही आम्हाला का सल्ला देताय. तुम्ही भाजपकडे गेलात, आता पाठिंबा काढून घेतला. आम्ही ११ आमदार दिले तेव्हा आम्ही म्हटलं बस्स झालं. मराठवाडयात कशाला येता..त्यामुळे तुम्ही कशाला विचारता आम्हाला. केव्हापर्यंत भाजपची री ओढणार. स्वत. ठाकरे ब्रँडचं अस्तित्व खराब करुन घेताय, स्वत.च पोरगं निवडणुकीत पडलं, तुम्ही हुशार राजकारणी, डोक्याने वागलं पाहिजे नाही तर मुख्यमंत्री फडणवीस तुम्हाला संपवून टाकतील.
खासदारकी, आमदारकीच्या निवडणुकी जवळ आल्या की तुम्हाला जवळ धरतात. मतदान मिळालं की दूर लोटून देतात. आता नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यात. त्यात ठाकरे बंधूनी एकत्र कार्यक्रम घेतला तर ते भयभीत झालेत. पुन्हा मुख्यमंत्री जवळ येत तुमच्या घरी जेवलेत म्हणजे तुम्ही खुश मात्र त्यामुळे गेला तुमचा पक्ष खड्डयात अशी बोचरी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.
नेमकं राज ठाकरे काय बोलले होते…
काल राज ठाकरे त्यांनी ठाण्यात दौ-यावर होते. येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पत्रकारांनी मराठा आरक्षणाबाबत प्रश्न विचारला. गेल्या दोन दिवसांपासून मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय. त्यावर राज ठाकरे म्हणाले एकनाथ शिंदे मागच्यावेळी नवी मुंबईत गेले होते, त्यावेळी त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आले, या प्रश्नांची सगळी उत्तरं एकनाथ शिंदे देतील.