इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गेल्या दोन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची आज शिंदे समितीने आझाद मैदानात उपोषणस्थळी भेट घेतली. या भेटीत शिंदे समितीने आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा सांगितला. त्यानंतर सरकार काय करणार याची माहिती दिली. पण, शिंदे समितीकडून जे मुद्दे मांडण्यात आले त्यातील बहुतांश मुद्यांना जरांगे पाटील यांनी विरोध केला. सरसकट मराठे कुणबी ठरत नसतील तर मग सरसकट जात ओबीसीमध्ये समावेश कशी केली जाते. अशी विचारणा जरांगे पाटील यांनी केली. यावेळी एखाद्या जातीला ओबीसी ठरवण्याचा अधिकार या समितीला नसल्याचे शिंदे समितीने जरांगे पाटील यांना सांगितले.
यावेळी शिंदे समितीने एखाद्या व्यक्तीला जातीचा दाखला मिळू शकेल. मात्र सरसकट समाजाला दाखला मिळू शकणार नाही असे सांगितले. सर्व मराठ्यांनी कुणबी ठरवता येणार नाही असे शिंदे समितीने सांगण्याचा प्रय़त्न केला. त्यानंतर जरांगे पाटील यांनी आपल्या मागणीवर ठाम राहतांना जोपर्यंत मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जीआर निघत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही असे स्पष्ट सांगितले. जीआर काढण्यासाठी कोणतीही मुदत देणार नाही असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे हैदराबाद आणि सातारा गॅझिटिएरची तातडीने अंमलबजावणी करावी यासाठी एक मिनिट सुध्दा वेळ देणार नाही अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली.
जरांगे पाटील यांचा उपोषणाचा दुसरा दिवस असून आता सरकारने उपोषण मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. पण, जरांगे पाटील यांनी सर्व मागण्या मान्य करेपर्यंत मागे न हटण्याची भूमिका घेतली आहे.