जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- २९ ऑगस्ट २०२३ रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाची वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने मनोज जरांगे यांनी गोदापट्ट्यातील १२३ गावांच्या आंदोलक समन्वयकांची बैठक बोलावली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत २९ सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण करणार असल्याचे जाहीर केले.
यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाज अडचणीत आहे, त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत हटणार नाही. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरुच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीसांचे ११३ आमदार पाडणार असे ते म्हणाले. भाजपमधील सगळे मिळून फडणवीसांचा काटा काढणार, त्यांना राजकारणात ठेवणार नाहीत असे लोक आपल्याजवळ येऊन बोलतात असेही जरांगे यांनी यावेळी सांगितले. फडणवीसांचे लोक आपल्याला रात्री येऊन भेटतात असा दावाही त्यांनी केला. भुजबळांपेक्षाही अधिक जातीयवाद हा फडणवीसांनी पसरवला असल्याची टीकाही त्यांनी केली. यावेळी त्यांनी रावसाहेब दानवेंवरही टीका केली. दानवे यांनी माझ्या नादाला लागु नये असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही भाष्य केले. मुख्यमंत्री यांची शपथ पूर्ण झालेली नाही. सरकारने सगेसोयरे अंमलबजावणीत आम्हाला फसवलं. आम्ही कोणतीही किंमत मोजू पण आरक्षण ओबीसीतूनच घेऊन असा इशाराही जरांगे यांनी दिला.