इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजीनगर : ‘जे लोक हिंदू खतरे में म्हणतात, त्यांना मराठ्यांची आरक्षण लढ्यातील एकजूट दिसत नाही का,’ असा सवाल मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केला. भाजपप्रणित महायुती सरकारवर टीका करताना मराठा जातीमध्ये मतदानाबाबत कोणताही संभ्रम नसून लोकसभेत सांगितले, तेच विधानसभेत करायचे आहे, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
निवडणुकीमध्ये मराठा समाज महायुती सरकारला त्यांचा राग दाखवून देईल. मुस्लिमांना विरोध करताना मराठा समाजाच्या हातात लाठ्या देऊन त्यांचा वापर करून घेतला जातो. ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’ ही दोन्ही घोषवाक्ये कोणासाठी आहेत, असा सवाल करताना मराठा ही हिंदूमधील मोठी जात आहे. तेव्हा आम्ही आमचे बघून घेऊ. आम्ही शिवछत्रपतींचे हिंदूत्व मानतो, असे जरांगे म्हणाले. मराठा समाजाला माहीत आहे, कोणाला पाडायचे आहे त्यामुळे कोणताही संभ्रम नाही, असेही ते म्हणाले.
जे आरक्षण विरोधी आहेत, त्यांना ते शंभर टक्के पाडतील. मोदी यांच्या विकासाच्या दाव्यावर जरांगे यांनी तिरकस टीका केली. मुस्लिम, दलित व्यापाऱ्यांच्या मनात सत्ताधाऱ्यांविषयी राग आहे. तो मतदानातून व्यक्त होईल, असे ते म्हणाले. दीडशे वर्षांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण होते; पण नंतर त्यांना आरक्षण कोट्यातून बाहेर काढण्यात आले. त्यामुळेच आरक्षण आंदोलन पुढे चालू ठेवण्यासाठी निवडणुकीत उमेदवार उभे केले नसल्याचा दावा जरांगे यांनी केला. सरकार कोणाचेही येवो, पुन्हा जानेवारीपासून आरक्षणाच्या मागणीसाठी सामूहिक आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.