नांदगाव – नांदगाव तालुक्यातील खादगांव येथील ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच सौ.संगीता शिवाजी वडक्ते यांना अपात्र ठरवलेला निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे वडक्ते यांचे सरपंचपद कायम राहणार आहे. शौचालय नसल्याने त्यांचे पद रद्द करावे या तक्रारीवरुन नाशिकचे मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांनी अपात्र ठरलल्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर येथे न्यायालयाने वडक्ते यांच्या बाजूने निकाल दिला.
खादगाव येथील थेट सरपंचाची निवडणूक डिसेंबर २०१९ मध्ये झाली होती. यावेळी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत सौ.वडक्ते विजयी झाल्या. पण, त्यांच्या निवडीनंतर काही दिवसातच विरोधी गटाकडून सदर सरपंच महिलेकडे शौचालय नसून निवडणूक आयोगाची फसवणूक केली असल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी व अप्पर विभागीय आयुक्त नाशिक यांनी शौचालय असल्याबाबतचा ग्रामसभेचा ठराव नामनिर्देशन पत्रासोबत न जोडल्यामुळे अपात्र करण्याचा आदेश दिला होता.
या आदेशाच्या विरोधात सौ.वडक्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केल्यानंतर सदर आपिलावर उच्च न्यायालयात सुनावणी होऊन त्यात सौ.वडक्ते यांनी निवडणुकीच्या वेळेस शौचालय असून ते वापरत असल्याचे स्वयंघोषणापत्र जोडलेले होते. त्या आधारे उच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल देत विभागीय आयुक्त नाशिक व अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांनी दिलेले अपात्र करण्याचे आदेश रद्द केले. या सर्व कायदेशीर लढाईत ज्येष्ठ नेते मंडू वडक्ते,बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घुगे यांचे मार्गदर्शन लाभले असून सौ.वडक्ते यांच्यातर्फे अॅड. रामेश्वर.एन. गीते यांनी कामकाज पाहिले.