मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कॉमनवेल्थ वेटलिफ्टींग चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर हीची सलग पाचव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून तर जय भवानी व्यायाम शाळेचा आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर याची भारतीय संघात निवड झाली आहे.
उत्तर प्रदेश नोएडा येथे १२जुलै ते १६ जुलै दरम्यान होणाऱ्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपसाठी वरिष्ठ गटात मनमाडच्या जय भवानी व्यायाम शाळेच्या मुकुंद संतोष आहेर याची भारतीय संघात ५५ किलो वजनी गटात निवड करण्यात आली आहे. नागरकोईल येथे झालेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ज्युनिअर व सीनियर गटात राष्ट्रीय विक्रम स्थापित करणारा मुकुंद आपल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज झाला असून नोएडा येथे होणाऱ्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत मुकुंद भारतासाठी पदक प्राप्त करण्याची शक्यता आहे.
तसेच आपल्या सलग पाचव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाची प्रशिक्षक म्हणून निवड झालेली तृप्ती शेखर पाराशर ही महाराष्ट्रातील एकमेव प्रशिक्षक असून स्पर्धेत खेळाडूंकडून उत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज झाली आहे. मुकुंद आहेर यास छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील, मोहन अण्णा गायकवाड, डॉ सुनील बागरेचा,प्रा दत्ता शिंपी, छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी. जी. धारवाडकर, अध्यक्ष पी. जे. दिंडोरकर, संचालक नाना कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ, आर. एन. थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, पर्यवेक्षिका सौ पोतदार एस. एस., महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने, सचिव प्रमोद चोळकर यांनी अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.