मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील रेल्वे जंक्शन स्थानकातील फलाट क्रमांक एक नजीक असलेल्या लूप लाईनवर उभे असलेल्या इंधन वाहतुक करणाऱ्या मालगाडी वरील छातावर चढून अज्ञात २७ वर्षीय इसम हाय व्होल्टेज असलेल्या रेल्वे ओव्हर हेड वायरवर उडी मारल्याने गंभीर जखमी झाला. सुदैवाने इंधन वाहतूक करणारी गाडी रिकामी असल्याने मोठे अनर्थ टळला आहे. या तरुणाला पुढील उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नेहमी गजबजलेल्या मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकात रविवारी रात्रीच्या सुमारास स्थानकातील फलाट क्रमांक एक जवळ असलेल्या लूप लाईन इंधन वाहतुक करणारी रिकामी मालगाडी उभी असतानां २७ वर्षीय अज्ञात तरुणाने गाडीवर चढून रेल्वेच्या हाय होल्टेज ओव्हर हेड वायरवर उडी मारली. विजेचा शॉक जबर असल्याने तो खाली कोसळला.
सदर घटना लोहमार्ग पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अज्ञात तरुणाला मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारकरिता घेऊन गेले. मात्र तो गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले. मात्र सदरील तरुण हा मनोरुग्ण असल्याची चर्चा सर्वत्र होत होती. घटनास्थळी रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी लोहमार्ग पोलीस आणि स्थानकातील तिकीट निरीक्षक यांच्यासह बघणाऱ्यांची गर्दी मोठी झाली होती.