मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड इथे तिन्ही ऑइल कंपनीमध्ये टँकर ट्रान्सपोर्टरच्या चालकांनी अचानक संप पुकारला आहे. सकाळपासून एकही टँकर इंधन भरण्यासाठी गेलेला नाही. त्यामुळे नाशिक, धुळे, जळगाव नंदुरबार, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड या जिल्ह्यांना पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याचा सामना करावा लागू शकतो. या सर्व जिल्ह्यांना मनमाडहून पेट्रोल व डिझेलचा पुरवठा केला जातो. या सर्व जिल्ह्यांचा इंधनपुरवठा थांबलेला आहे. नाशिक शहर व जिल्ह्यात दुपारनंतर पेट्रोल पंप पुरवठ्याअभावी बंद पडण्यास सुरुवात होईल, असे सांगितले जात आहे.
या संपाबाबत अजून तरी काही तोडगा निघालेला नाही. पोलीस स्थानकात बैठक बोलवण्यात आली असून त्यात तोडगा निघण्याची शक्यता आहे. इंडियन ऑइलच्या डेपो समोर नागापूर ग्रामस्थ व टँकर ड्राइवर व मालक यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर ग्रामस्थांनी उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फोडल्या. गॅस प्लांट मधून निघालेल्या एक ड्राइवरला मारहाण झाली. त्यानंतर ड्राइवर लोकांनी गाड्या भरण्यास नकार दिलेला आहे.
भरलेल्या गाड्या कंपनीने नुकसान टाळण्यासाठी आज बाहेर सोडलेल्या नाहीत. मनमाड जवळ असलेल्या पानेवाडी येथे एचपीसीएल बीपीसीएल तिन्ही कंपन्यांचे डेपो आहे. या सर्व कंपन्याच्या ट्रान्सपोर्टरच्या टँकर चालकांनी संप पुकारल्यामुळे पाच-सहा जिल्ह्यांना होणारा पेट्रोल डिझेलचा पुरवठा पूर्णपणे थांबला आहे.