मनमाड – येथील श्रावस्ती नगर भागातील बंगल्यातील कुंटुंब बाहेर गावी गेले असल्याचा गैरफायदा घेत बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण सुमारे चार लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना काल मंगळवारी रात्री घडली. सदर घटनेने येथील रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली असून भीतीचे सावट पसरले आहे. शहरातील मनमाड-येवला रोडवर असलेल्या श्रावस्तीनगर भागात राहणारे बीएसएनएलचे सेवानिवृत्त कर्मचारी मधुकर भागाजी पगारे (वय-५५) हे आपल्या कुटुंबा सोबत राहात असून ते बंगल्याला कुलूप लावून संपूर्ण कुटुंबासह मूळगावी शिंगवे येथे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. त्यानंतर बुधवारी सकाळी सर्व कुटुंब श्रावस्ती नगर राहात असलेल्या घरी परत आले असता त्यांना गेटचे लोखंडी दरवाजाचे व बंगल्याच्या लाकडी दरवाजाचे कडी कोंडे तोडलेले दिसून आले. त्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर घरातील कपाटाचे ड्राव्हर काढून पलंगावर ठेवलेले व सर्व सामान इतत्र फेकलेले आढळून आल्याचे दिसले. कपाटही उघडलेले दिसून आले कपाटाचे लॅाकर तोडले. चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यासह २०००० रुपये रोख असा एकूण ३६०००० रुपये ऐवजावर चोरटयांनी चोरुन पोबारा केला आहे. याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक पी.बी.गीते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.