मनमाड – येथील पांडुरंग नगर येथे राहणाऱ्या सासू सुनेचा एकाच विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवारी दुपारी घडल्याने शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे गटनेते गणेश धात्रक यांच्या मळ्यात राहणारे नगरपालिकेतील कर्मचारी सचिन अशोक पवार यांची आई गयाबाई अशोक पवार (वय-५०)पन्नास या जवळच असलेल्या विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेल्या असता पाणी काढतांना त्यांचा तोल विहिरित गेल्याने त्या विहिरीत पडल्या. त्यानंतर त्या ओरडू लागल्या. त्यांचा आवाज एेकून समोरच असलेल्या त्यांच्या सुन मनीषा सचिन पवार (वय-२६) या पळत जाऊन सासूला वाचविण्यासाठी गेल्या. त्यांनी एक साड़ी विहिरित खाली सोडून सासूला वर काढण्याच्या प्रयत्न केला. या प्रयत्नात सुनेचाही तोल गेला व त्या विहीरीत पडल्या. या घटनेत सासू सुनेचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची मनमाड पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जी.यू. तायडे पुढील तपास करीत आहेत.