मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांची मनमाड उपजिल्हा रुग्णालयास अचानक भेट दिली. येथे रुग्णालयाची अवस्था बघून पवार चांगल्याच संतापल्या. रुग्णसेवा देता येत नसेल तर पगार कसला घेता, रुग्णालय बंद करा अन घरी बसा असा सज्जड दम केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी मनमाड उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करीत असतांना येथील डॉक्टरांसह सर्वांनाच दिला. मनमाड येथील एका कार्यक्रमासाठी त्या आल्या असता त्यांनी अचानक उपजिल्हा रुग्णालयात जाऊन पाहणी केली. येथे अस्वच्छता, आपातकालीन कक्षात धूळीच साम्राज्य, एक्सरे मशिनमध्ये त्रुटी अशा अनेक असुविधा त्यांच्या नजरेस पडल्याने संतापलेल्या डॉ.भारती पवार यांनी आपला संताप व्यक्त केला. तुम्हाला सस्पेंड का करु नये असे म्हणत त्यांनी थेट जिल्हा शल्य चिकित्सकांशी संपर्क साधत तातडीने मनमाड उपजिल्हा रुग्णालयास भेट देण्याच सांगत आवाहल सादर करण्याचे आदेश दिले.