मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जनशताब्दी एक्सप्रेसची कपलिंग तुटल्यामुळे इंजिनसह अर्धी गाडी पुढे गेली तर उर्वरीत रेल्वेचे डब्बे प्लॅटफॅार्मवरच राहिले. सुदैवाने ही घटना रेल्वे कर्मचा-यांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने गाडी थांबवण्यात आली. दोन रेल्वे डब्यांना जोडली जाणारी कपलिंग तुटल्यामुळे ही गाडी दीड तासा पासून रेल्वे स्थानकावर उभी होती. जालन्याकडून मुबंईकडे जाणा-या जनशताब्दी एक्सप्रेस मनमाड रेल्वे स्थानकात आल्यानंतर ही घटना घडली. गाडी सुरु झाल्यावर अर्धी गाडी पुढे गेल्यावर हा प्रकार समोर आल्यानंतर तातडीने गाडी थांबविण्यात आली. त्यानंतर रेल्वे कर्मचा-यांनी कपलिंगचे काम पुर्ण केले. ही गाडी दीड तासापेक्षा जास्त काळ मनमाड रेल्वे स्थानकावर उभी होती. धावत असतांना जर हा प्रकार घडला असता तर अपघाताचा मोठा धोका होता. सुदैवाने रेल्वे स्थानकात हा प्रकार घडल्याने मोठा अनर्थ ठळला.