अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनमाड – औरंगाबाद रेल्वे लाईनवर आनंदवाडी जवळ वाहतुकीसाठी बांधलेल्या भुयारी मार्गामध्ये काल झालेल्या पावसाने ४ ते ५ फूट पाणी साचून या मार्गाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे वंजारवाडी ,सटाणा, क-ही, माळेगाव, घाडगेवाडी, निशाणवाडी, मोहेंगाव, भालूरसह नऊ गावांचा मनमाड शहराशी संपर्क तुटला आहे. या गावातील विद्यार्थी,ग्रामस्थ व वाहन चालकांना रेल्वे लगतच्या गाळयुक्त कच्चा रस्त्यातून मार्ग काढावा लागत असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भुयारी मार्गातील पाण्याचे त्वरित निचरा करण्याची व्यवस्था करावी, किमान पावसाळ्यात तरी या गावात जाणाऱ्या नागरिकांना वाहतुकीसाठी रेल्वे फटकाचा पर्याय सुरू ठेवावा अशी मागणी होत आहे.