अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनमाड जवळ असलेल्या अनकवाडे शिवारात वन हद्दीलगतच्या भागात रानडुकरांनी हैदोस घालून शेतीचे नुकसान केले आहे. या भागात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतक-यांनी शेतात मक्याचे बियाणे टाकले. मात्र रात्रीच्या वेळी रान डुकरांनी मका बियाणे उकरून फस्त केली. रोज हे रानडुकर येथे या भागातील शेतकऱ्यांना मोठे नुकसान करत असतात. शंभो महादेव डोंगर ते अंकाई किल्ला पायथ्याशी मोठ्या प्रमाणावर जंगल असल्याने रानडुकरांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. दरवर्षी हे रान डुकरे हैदोस घालून मका पिकाचे नुकसान करतात. वनविभागाकडे तक्रार करूनही कुठलीही दखल घेतली जात नाही. वन विभागाने या रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील शेतकरी करीत आहे.