अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नागरकोट हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या पहिल्या राष्ट्रीय खेलो इंडिया महिला लीग वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी जय भवानी व्यायामशाळेच्या पाच खेळाडूंची निवड झाली आहे. भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे वतीने १५ ते २२ जून दरम्यान आयोजित भारतातील पाहिल्या महिलांच्या खेलो इंडिया रँकिंग स्पर्धांचे आयोजन नागरकोट हिमाचल प्रदेश येथे केले आहे. भारतातील सर्वोत्तम खेळांडूमध्ये स्पर्धा होऊन युथ ज्युनिअर व सिनियर च्या प्रत्येकी १० वजनी गटात स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक वयोगट व वजनी गटात पहिल्या ८ खेळाडूंना रोख बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मनमाड महाविद्यालयाच्या दिया किशोर व्यवहारे,धनश्री विनोद बेदाडे,छत्रे विद्यालयाची संध्या भास्कर सरोदे,करिश्मा रफिक शेख,निकिता वाल्मिक काळे या जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची पहिल्या महिला खेलो इंडिया रँकिंग लीग साठी महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघात निवड करण्यात आली आहे. यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे,आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.