अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनमाड शहर परिसरात बुधवारी सांयकाळी सुरू झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे कांदापिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .शहर व परिसरातील नऊ ते दहा कांदा शेड वादळी वाऱ्यामुळे कोसळले. त्यामुळे एक ते दीड कोटी रुपयांचे अंदाजे नुकसान झाल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.जोरदार झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची कांदा झाकून ठेवण्यासाठी धांदल उडाली त्यामुळे साठवून ठेवलेला कांदा व काढणीस आलेल्या कांद्यासह इतर पिकांना मोठा फटका बसला. तर व्यापाऱ्यांच्या खळ्यात बाहेर गावी पाठविण्यासाठी गोण्या मधील भरलेला व मोकळा ठेवलेला कांदा पावसात वाहून गेला. बराचसा कांदा पावसात भिजल्याने तो कमी किमतीत विकण्याची वेळ येणार असल्याचे व्यापारी सांगतात. कालच्या वादळी पावसाने शहरातील अनेक भागांत विजेचे खांब,पत्र्याच्या शेड , शाळेचे पत्रे उडाले तर काही ठिकाणी अनेक घरांची पडझड झाली काल पासून खंडित झालेला वीज पुरवठा अद्याप सुरळीत झालेला असून आज सुद्धा दिवसभर वीज पुरवठा सुरळीत होण्याची शक्य कमी असल्याचे बोलले जात आहे.