अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनमाड – जागतिक युथ स्पर्धेसाठी आकांक्षा किशोर व्यवहारेची भारतीय संघात निवड झाली तर महाराष्ट्रातील पहिलीच वेटलिफ्टिंगची आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर हिची पुन्हा एकदा मेक्सिको येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय युथ स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग संघटना आयोजित जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या खेळाडूंची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेतली आहे. मेक्सिको लिओन येथे ९ ते २० जून दरम्यान होणाऱ्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी गुरू गोविंद सिंग हायस्कुल व जय भवानी व्यायामशाळेची गुणी खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे हिची ४० किलो वजनी गटात भारतीय संघात निवड झाली आहे. तर महाराष्ट्रातील पहिलीच आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर हिची सलग दुसऱ्यांदा भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदी निवड करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाच वेळी प्रशिक्षक व खेळाडू म्हणून दोघींची निवड झाल्याने मनमाड शहर तसेच नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंनी आनंद व्यक्त केला असून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी बजावण्यासाठी तृप्ती व आकांक्षा सिध्द झाल्या आहेत जय भवानी व्यायामशाळेच्या गुरू शिष्यांची जोडी मेक्सिको येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत निश्चितच उत्तम कामगिरी करतील असा विश्वास क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांनी सांगितले.