अजय सोनवणे, मनमाड
उत्तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना इंधन पुरवठा करणाऱ्या मनमाड जवळच्या पानेवाडी येथील ऑइल कंपन्यासमोर पेट्रोल पंप चालकांनी आज सकाळी आंदोलन केले. पेट्रोलियम कंपन्या व शासनानाच्या मनमानी कारभार व डिलर कमिशन वाढवून मिळावे यासाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी खरेदी बंद लक्षवेधी आंदोलनास मनमाडमध्ये संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. मराठवाडा, खान्देश व विदर्भाला इंधन पुरवठा करणाऱ्या मनमाडच्या तेल प्रकल्पामध्ये बहुतांशी पेट्रोल पंप चालकांनी खरेदी केली नाही. तर १५ ते २० टक्के टँकर भरून जातांना दिसत होते. यावेळी नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर आसोशिएशन नेतृत्वाखाली मनमाड येथील इंधन प्रकल्पासमोर धरणे आंदोलन करून इंधन कंपनीच्या मनमानी कारभाराचा निषेध केला. तसेच डीलर कमिशन वाढवून देण्याची मागणी करण्यात आली.