मनमाड – शहरात आरोग्य क्षेत्रात २००६ पासून १६ वर्ष अविरत पणे रुग्ण सेवेचे कार्य करणाऱ्या आनंद सेवा केंद्र या रुग्ण सेवाभावी संस्थेला यंदाचा (२०२२) अर्पण रक्तपेढी नाशिक तर्फे दिला जाणारा रक्तदान क्षेत्रातील नामांकित “रक्त संघटक” या पुरस्काराने गौरविण्यात आले. रक्तदान क्षेत्रातील सातत्याने अतुलनीय निस्वार्थी कार्य करणाऱ्या संस्थाना हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. मनमाड शहरात आरोग्य व रुग्ण सेवेत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आनंद सेवा केंद्राची ही निवड मनमाड शहराला अभिमानास्पद आहे. २००६ साली आरोग्यसेवेसाठी स्थापन झालेल्या आनंद सेवा केंद्रा तर्फे सन २००८ साला पासून सलग १४ वर्ष भगवान महावीर यांचे जयंती निमित्ताने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते. गेल्या १४ वर्षात या शिबिराच्या माध्यमातून आनंद सेवा केंद्रा ने २००० पेक्षा ही जास्त रक्त पिशव्या संकलित केल्या आहेत. संपूर्ण विश्वावर आलेल्या महाभयंकर कोविड -१९च्या संकट काळात २०२० मध्ये १६५, २०२१ मध्ये १५४ तर यंदा १७१ रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या. गेल्या १४ वर्षात आनंद सेवा केंद्राच्या माध्यमातून हजारो रुग्णांना अतितातडी काळात ही रक्तदान संबंधित विशेष मदत करण्यात आली. अर्पण रक्तपेढी तर्फे नासिक येथील इंडियन मेडिकल असोसिएशन हॉल मध्ये आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये अर्पण रक्तपेढीचे सर्वोसर्वा प्रमुख नंदकिशोरजी ताथेड आणि जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) च्या मुंबई क्षेत्र प्रमुख श्रीमती सुनीताजी बोरा या मान्यवरांच्या हस्ते रक्त संघटक स्मृती चिन्ह प्रमाणपत्र देऊन हा गौरव करण्यात आला. आनंद सेवा केंद्राच्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपात आनंद सेवा केंद्राचे अध्यक्ष कल्पेश बेदमुथा, उपाध्यक्ष योगेश भंडारी, दीपक शर्मा, ललित धांदल,विनय सोनवणे,चेतन संकलेचा, नितिन अहिरराव, अमोल देव, संजय गांधी, अनुप पांडे प्रमोद भाबड यांनी स्वीकारला. या पुरस्कारचे खरे मानकरी आनंद सेवा केंद्राच्या रक्तदान चळवळीत नियमितपणे रक्तदान करणारे रक्तदातेच आहेत म्हणून हा पुरस्कार त्या निस्वार्थी रक्तदात्याना समर्पित असून सर्वाच्या सहकार्य ने हा रुग्ण सेवेचा यज्ञ पुढे ही सुरु राहील असे याप्रसंगी कल्पेश बेदमुथा यांनी सांगितले. या पुरस्कारा मुळे आनंद सेवा केंद्राचे चे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.