अजय सोनवणे
मनमाड- राज्य परिवहन महामंडळातील संपाच्या काळात बडतर्फ केलेल्या एसटी कामगारांना पुन्हा सेवेत हजर करून घेतल्याने आज हे कर्मचारी शनिवारी वाजत-गाजत व जल्लोष करीत सेवेत सामील झाले. त्यामुळे आता लालपरी जोमाने धावणार असल्याने सर्वसामान्य प्रवाशांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता. राज्य सरकारमध्ये एसटीच्या विलीनीकरण आणि इतर मागण्या घेऊन एसटीचे कर्मचारी संपावर बसलेले होते. आता एसटी कर्माचाऱ्यांचा संप मिटला असून एसटी कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. यात मनमाड आगारातील एसटीच्या एकूण २३६ कर्मचाऱ्यांपैकी ५९ बडतर्फ कर्मचारी शनिवारी कामावर रुजू झाले. आज सकाळी कामावर हजर होण्यापूर्वी ढोल-ताशांच्या गजरात एसटीची पूजा नारळ फोडून आगारातील दत्त मंदिरात पूजा करून कामाला सुरुवात आली .तर मनमाड आगारातील सर्व एसटी कर्मचारी कामावर हजर झाल्यामुळे या भागातील अनेक मार्गावरील बस सेवा सुरळीत होणार असून एसटी बसच्या फेऱ्या देखील वाढणार आहेत. एसटी सुरु झाल्याने प्रवाशांच्या अडचणी संपणार आहे. तर बसस्थानकात प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रवासी पहिल्यासारखा एसटीकडे आकर्षित होत असल्याचे चित्र दिसत आहे.