मनमाड – चांदवड तालुक्यातील ऊसवड येथील तरुणांची चाकूने भोसकून चार तरुणांनी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मनमाड रेल्वे स्थानकाच्या फ्लॅटफॅार्म क्रमांक चारवर घडली आहे. शिवम संजय पवार वय-२१ असे हत्या झालेल्या तरुणांचे नाव आहे. प्रेयसीच्या मित्राचे फेक आयडी तयार करून अश्लील फोटो सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर वायरल केल्याच्या रागातून ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे.
भाऊबीजेच्या दिवशी झालेल्या या हत्येमुळे संपूर्ण पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शिवमला तीन बहिणी आहे. या घटनेनंतर शिवमची प्रेयसी मनीषा संजय साळवे वय -२० ,रा. उल्हासनगर हिने मनमाड लोहमार्ग पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे व शिवमचे गेल्या अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यामुळे मी माझे कामावरील मोहीत भोईर, निश, चेतन मोदडे यांचे सोबत असल्याने त्यांचेशी मोबाईल फोनवर बोलणे होत असे. शिवम त्यावरुन मोहीत चेतन यांना माझेशी बोलण्यास मनाई करुन त्यांचे इंस्टाग्रामवर फेक आयडी करुन त्यांचे अश्लिल फोटो टाकल्याचा त्यांना राग आला. त्यांनी शिवमला झालेला गैरसमज दूर करायचा असे सांगुन मला मनमाड येथे घेवून आले. व तेथे शिवम सोबत झालेल्या भांडणाचा व त्याने टाकलेले इंस्टाग्रामवरील त्यांचे टाकलेले बदनामीकारक फोटो याचा राग आल्याने त्यांनी शिवमचा खून केला.प्लटफार्म नं .४ वर ट्रेन नंदिग्राम एक्सप्रेस ही गाडी उभी असताना माझे समोरच मोहीत , चेतन , निश , मयुर यांनी सोबत राहून त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. तर मयुरने त्याचेवर चाकूने वार करुन त्याचा खून केला, असे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी मनमाड लोहमार्ग पोलीस स्थानकात भादंवि ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड करीत आहे. फरारी आरोपींना पकडण्यासाठी मुंबईकडे पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी लोहमार्ग उपविभागीय अधीक्षक दीपक काजवे यांनी घटनास्थळी भेट दिली.