मनमाड – निसर्गापुढे हतबल झालेल्या शेतकरी डोळ्यासमोर वाहून गेलेले पिकाने आधीच मेटाकुटीस आलेला आहे आणि त्याला थकीत वीज बिलाचे कारण देऊन त्याचे वीज कनेक्शन कट करण्याचे काम थांबवा अन्यथा शिवसेना स्टाईलने महावितरण विरोधात आंदोलन केले जाईल आणि यात काही बरे-वाईट झाल्यास महावितरण त्या जबाबदार असेल असा इशारा आमदार सुहास आण्णा कांदे यांनी आज मनमाड शिवसेना कार्यालय येथे झालेल्या महावितरण च्या अधिकाऱ्यांना दिला.
मनमाड शिवसेना कार्यालय येथे महावितरण वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत आमदार सुहास कांदे यांनी बैठक घेतली. गेल्या काही दिवसांपासून वीज वितरण कंपनी सर्रास शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन व डीपी बंद करण्याचे मोहीम हाती घेतली आहे. यामुळे आधीच अतिवृष्टीमुळे वैतागलेला शेतकरी अडचणीत सापडला आहे. आमदार सुहास आण्णा कांदे यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज बिलाची सक्तीने वसुली करू नये तसेच शेतकऱ्यांच्या डीपीचे कनेक्शन देखील कट करू नये अशी विनंती वजा इशारा दिला. उत्तर महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस नांदगाव तालुक्यात झाला आहे. आणि यामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे त्याच्याकडे दिवाळी साजरी करण्यासाठी देखील पैसे नाही आणि दुसरीकडे वीज बिल थकबाकीच्या नावाखाली सर्रास कनेक्शन तोडले जात आहे. पीक हातातून गेल्यानंतर भविष्यातील पिकांवर शेतकऱ्यांची आशा लागून आहे. अशातच वेळी-अवेळी येणे आणि जाणे या संकटांना तोंड देत शेतकरी कशीबशी शेती करत आहे. त्यातही वीज कंपनी शेतकऱ्यांना विज बिलचे कारण देऊन डीपी कनेक्शन कट करत आहे. शेतकरी संकटात असताना एक लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वस्थ बसू शकत नाही , मला जनतेला उत्तर द्यावे लागते आणि जर मी जनतेसाठी हे करू शकत नसेल तर मग काय उपयोग म्हणूनच वीज कंपनीने त्वरित वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम थांबवावी अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत शिवसेना मोठी आंदोलन करण्यास तयार आहे असे ठणकावून सांगितले. आपली ही मोहीम शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचे सांगून आमदारांनी वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांनी संपर्क केल्यानंतर किंवा भेट दिल्यानंतर त्यांच्याशी उद्धट भाषा करून बोलणे किंवा त्यांना धुडकावून लावण्याची आपली पद्धत बदलण्याची सूचना दिल्या, आपला ग्राहक म्हणून आणि आपल्या अन्नदात्याची आपण उद्धट भाषेत बोलू शकत नाही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपण समजावून सांगा आणि येत्या काळात विज बिल भरण्यासाठी त्यांना मुदत द्या असा सज्जड दम आमदार सुहास आण्णा कांदे यांनी वीज वितरण कंपनीच्या उपस्थित अधिकाऱ्यांना दिला.
यावेळी वीज वितरण कंपनीचे अधिकारी, शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक अल्ताफ खान, जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद, तालुकाप्रमुख किरण देवरे, शहरप्रमुख मयुर बोरसे, गुलाब भाबड, मुन्ना भाऊ दरगुडे, दिनेश केकान,लियाकत शेख, अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.