अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनमाड जवळ असलेल्या चांदवड तालूक्यातील कातरवाडी शिवारातील भागवत झाल्टे यांची पाच एकर शेती तलावा लगत आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने पाझर तलाव भरला आणि त्याचे पाणी झाल्टे यांच्या शेताबरोबरच अन्य शेतक-यांच्या शेतात घुसल्याने सध्या शेतातील मका, बाजरी तसेच कांद्याचे रोप पूर्णपणे पाण्याखाली गेले. त्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने अशा शेतक-यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावे अशी मागणी करण्यात येत आहे. या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मनमाड येथे आल्यावर ग्रामस्थांतर्फे निवेदन देण्यात येणार आहे. चांदवडचे आमदार डॉ.राहूल आहेर यांनीही याकडे लक्ष देण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.