मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – शहरात चौथीत शिकणा-या नऊ वर्षीय लोकेश सोनवणे याच्या खूनाचा उलगडा अवघ्या दोन तासात पोलिसांनी लावला आहे. या लहान मुलाचा संशयास्पदरित्या मृतदेह गुरुवारी आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी सायंकाळीच एका संशयास्पद आरोपीला अटक केली होती. राहूल उत्तम पवार उर्फ सोन्या (१९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव असून तो लोकेश याच्या घराजवळच राहतो. खाऊचे आमिष दाखवत आरोपीने त्याला निर्जनस्थळी नेत त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केल्यानंतर त्याची निर्घृणपणे हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.
बुधवारपासून लोकेश गायब होता. गुरुवारी सायंकाळी फिल्टर हाऊस जवळ पुणे लोहमार्गाशेजारी हात कापलेल्या तसेच चेहऱ्यावर ओरबडलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आल्याने नागरिकांमध्ये संतप्त भावना होती. या चिमुरड्याच्या निर्घृण हत्येचे तीव्र पडसाद काल मनमाडमध्ये उमटले होते. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी कॅण्डल मार्च काढला. त्यानंतर जमावाने जयश्री थिएटरसमोर पुणे-इंदूर महामार्गावर रास्ता रोको केला होता. यावेळी जमावाने जोरदार घोषणाबाजी केली होती.