मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर पोलिसांनी मोठी कारवाई करीत तब्बल २४ तलवारींचा अवैध साठा जप्त केला आहे. याप्रकरणी पंजाबमधील एका तरुणासह स्थानिक युवकाला अटक करण्यात आली आहे. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा कसून तपास करीत आहेत.
मनमाड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात अवैध तलवारींचा साठा आणि विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने शहरातील दत्त मंदिर रोडवरील गुरुद्वारा बाहेर लावलेल्या एका स्टॉलवरून २३ अवैध तलवारी आणि एका तरुणाच्या ताब्यातील एक अशा एकूण २४ अवैध तलवारींचा शस्त्र साठा जप्त केला आहे. याबाबत मनमाड शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध २४ तलवारी आणि एक मोटरसायकल असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी संदीप बाळासाहेब पवार (रा. वडगाव पंगु, ता. चांदवड) आणि चरणसिंग भूपेंदरसिंग (वय २७, रा. न्यू कोट आत्माराम सुलतान विंड रोड, अमृतसर, पंजाब) या दोघांना अटक करण्यात आली आहे. अवैध तलवार बाळगणे, तसेच विक्री करणे असा त्यांच्यावर आरोप आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील, पोलीस अधीक्षक शहाजी उमप, मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, पोलीस नाईक गणेश नरोटे, पोलीस शिपाई गौरव गांगुर्डे, पोलीस शिपाई राजेंद्र खैरनार, पोलीस शिपाई रणजीत चव्हाण, चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार आणि पोलीस शिपाई यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
Manmad Crime 24 Sword Seized 2 Arrested