नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मणीपूर येथील हिंसा थांबण्याचे काही नाव घेत नाही. दोन महिन्यांपासून अनेक प्रयत्न सुरू असतानाही जाळपोळ, हत्या सुरूच आहेत. अशात गुरुवात कहरच झाला. एका गावातील तीन महिलांची विवस्त्र धिंड काढण्याचा घृणास्पद प्रकार सोशल मिडियावर व्हायरल झाला आणि संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली.
खरे तर ही घटना ४ मे रोजी घडलेली आहे. पण त्याचा व्हिडियो आत्ता व्हायरल करून संपूर्ण देशात खळबळ माजवण्याचा प्रकार करण्यात आला आहे. इंडिजिनीयस ट्रायबल लीडर्स फोरम (आयटीएलएफ) या संघटनेकडून हा व्हिडियो व्हायरल करण्यात आला आहे. ४ मे रोजी कंगपोकपी जिल्ह्यातील बी फिनोम गावामध्ये ही घटना घडली. त्यावेळी पोलिसांनी यासंदर्भात एफाआयर दाखल केला होता. या एफआयआरमधील माहिती सुद्धा उघड झाली असून अंगावर काटा आणणारी घटना असल्याचे निदर्शनास आले आहे.
घटनेच्या दिवशी अत्याधुनिक शस्त्र हाती असलेले जवळपास एक हजार लोक बी फिनोम गावात घुसले. त्यांनी घरांना आग लावली. लोकांची हत्या केली, एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला आणि महिलांची विवस्त्र धिंडही काढली. एवलढे सगळे होत असताना ज्यांनी महिलांना वाचविण्याचा प्रयत्न केला त्यांची हत्या करण्यात आली. सशस्त्र गुंडांनी या घटनेचा व्हिडियो काढून तो व्हायरल सुद्धा केला. मैतेई युवा संघटना, मैतेई लिपून, कांगलेईपाक कनबा लूप, अरामबाई तेंगगोल, विश्व मैतेई परिषद या संघटनांनी हा हल्ला केला होता.
दिवसाढवळ्या बलात्कार
यातील एका २१ वर्षीय महिलेवर नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. तिच्या भावाने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्याची हत्या करण्यात आली. तिच्यासह आणखी दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आली. पैकी दोन महिलांनी जीव वाचवला आणि गावकऱ्यांच्या मदतीने पळून गेल्या. मात्र २१ वर्षीय महिलेवर दिवसाढवळ्या सामूहिक बलात्कार करण्यात आला.
पाच लोकांना घेरले आणि…
सशस्त्र हल्ल्यापासून वाचण्यासाठी गावकऱ्यांनी जंगलात आश्रय घेतला. पण त्यातील पाच लोकांना नराधमांनी घेरले. यामधील ५६ वर्षांच्या एका व्यक्तीची जागेवरच हत्या करण्यात आली. तर २१, ४२ व ५२ वर्षांच्या तीन महिलांची विवस्त्र धींड काढण्यात आली. आणखी एक १९ वर्षांचा तरुण कसाबसा जीव वाचवून पळाला.
सरकारविरुद्ध रोष
संसदेचे अधिवेशन सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी या घटनेवरून गदारोळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले. दोन महिन्यांपासून सरकारने मणीपूरमधील हिंसा रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या, असा सवाल विरोधकांकडून करण्यात येत आहे.