इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मणिपूरमधील हिंसाचार ही भारतापुढील सध्या सर्वांत मोठी समस्या आहे. गेल्या सहा महिन्यांपासून एक राज्य पेटलेले असणे ही गेल्या काही वर्षांतील एकमेव घटना असावी. मंगळवारी सकाळी तिघांची हत्या झाल्यामुळे पुन्हा एकदा मणिपूर पेटून उठले आहे. या घटनेनंतर अशांतता पसरली असून आता कोणत्या मार्गाने शांतता प्रस्थापित होईल, असा प्रश्न व्यवस्थेला पडलेला आहे.
दिल्लीमध्ये जी२० परीषदेसाठी जगभरातील बलाढ्य देशांनी हजेरी लावली. सर्वत्र भारताचे कौतुक झाले. पण त्याचवेळी मणिपूर पेटलेले होते. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेला हिंसाचार थांबलेला नव्हता. अर्थात गेल्या पाच दिवसांमध्ये कुठलीही वाईट घटना घडल्याची नोंद नव्हती. मात्र जी२०च्या सांगतेनंतर अगदी दुसऱ्याच दिवशी मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हत्या सत्र सुरू झाले. कांगपोकपी जिल्ह्यात अज्ञात आरोपींनी तिघांची गोळ्या घालून हत्या केली. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने येथील एक निवृत्त कर्नल आणि प्राध्यापकाला कठोर कारवाईपासून संरक्षण दिले आहे. २०२२ मध्ये प्रकाशित पुस्तकासाठी तसेच प्रक्षोभक भाषणासाठी मणिपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मणिपूर हिंसाचाराच्या प्रकरणात आपल्या बाजूने कोणताही वकील उभा राहणार नाही, असे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश देऊन न्यायालयाने त्याला दिलासा दिला आहे.
अशांत घोषित करा
मणिपूरमधील स्थितीचा अंदाज घेऊन केंद्र सरकारने खोऱ्यांमधील सर्व जिल्हे ताबडतोब अशांत क्षेत्र म्हणून घोषित करावे, अशी मागणी कमिटी ऑन ट्रायबल युनिटी या संघटनेने केली आहे. त्याचवेळी मणिपूरमध्ये सशस्त्र दल (विशेषाधिकार) कायदा लागू करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
Manipur Violence Three People Killed Gun Shot