इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या जातीय हिंसाचारात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मणिपूरमधील नग्न महिलांच्या व्हिडिओंनी देशभरात खळबळ उडाली आहे. ज्या पीडित महिलांना विवस्त्र करून रस्त्यावर चालायला लावले होते त्यापैकी एक माजी सैनिकाची पत्नी आहे. जो देशासाठी कारगिल युद्धात लढला होता. पत्नीसोबत झालेल्या गैरवर्तणुकीनंतर पतीच्या वेदना ओसरल्या असून कारगिलमध्ये आपण देश वाचवला, मात्र पत्नीची इज्जत वाचवू शकलो नाही, असे हताश वक्तव्य त्याने केले आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ ४ मे चा असून तो गेल्या दोन दिवसांपूर्वी समोर आला. या व्हिडिओचा आणि त्यातील घटनेचा देशभरातून निषेध करण्यात येत आहे. पीडित महिलेचा पती भारतीय सैन्यात आसाम रेजिमेंटमध्ये सुभेदार म्हणून कार्यरत होता. एका टीव्ही वाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले की, मी कारगिल युद्धात देशासाठी लढलो आणि भारतीय शांती सेनेचा भाग म्हणून श्रीलंकेलाही गेलो. मी देशाचे रक्षण केले, परंतु माझ्या निवृत्तीनंतर मी माझे घर, माझी पत्नी आणि गावातील ग्रामस्थांचे रक्षण करू शकलो नाही, याबद्दल मी निराश आहे. हे मला दुःखी करत आहे.
माजी सैनिक म्हणाला की, ४ मे रोजी सकाळी जमावाने परिसरातील अनेक घरे जाळली आणि दोन महिलांना विवस्त्र केले. त्यांना लोकांसमोर गावातील रस्त्यावरून फिरण्यास भाग पाडले. यावेळी पोलिस तेथे उपस्थित होते, परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. ज्यांनी घरे जाळली आणि महिलांचा अपमान केला त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी या सैनिकाने केली आहे.
व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे. एका ट्विटर पोस्टमध्ये, मणिपूर पोलिसांनी म्हटले आहे की राज्य पोलीस इतर गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. छापे टाकले जात आहेत. ३ मे रोजी राज्यात जातीय हिंसाचार सुरू झाल्यापासून १६० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि बरेच जण जखमी झाले आहेत.