इंफाळ – अतिरेक्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात आसाम रायफलचा अधिकारी, त्याची पत्नी, ८ वर्षांचा मुलगा आणि ४ जवान शहीद झाले आहेत. या घटनेबद्द्ल तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. हल्ला करण्यासाठी दबा धरुन बसलेल्या अतिरेक्यांनी अधिकाऱ्याच्या ताफ्यावर मोठा स्फोट घडवला. त्यात आसाम रायफलचे कमांडिग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी (वय ४६), त्यांची पत्नी, ८ वर्षांचा मुलगा आणि त्यांच्यासोबत असलेले ४ जवान शहीद झाले आहेत. अत्यंत भ्याड स्वरुपाचा हा हल्ला असून सर्वस्तरातून शहीदांना श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आदींनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
चुरचांदपूर जिल्ह्यातील सिंघाट येथे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. जखमी जवानांना तातडीने उपाचार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. तर, आसाम रायफल्सने या हल्ल्याची दखल घेत तातडीने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. आसाम रायफल्सचे अनेक जवान या मोहिमेत कार्यरत झाले आहेत. अद्याप कुठल्याही अतिरेकी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.
https://twitter.com/narendramodi/status/1459488175819091971