इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पाच राज्यातील निवडणूकांची मध्ये ईशान्येकडील महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या मणिपूर या राज्यात देखील विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. यावेळी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये मुख्य लढत रंगली होती, परंतु आता मणिपूर विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळविला आहे. एकूण ६० जागांच्या मणिपूर विधानसभेत बहुमतासाठी ३१ जागा आवश्यक होत्या. भाजपने तब्बल ३२ जागा जिंकून सत्ता मिळविली आहे. तर, काँग्रेसचा धुव्वा उडाला असून विरोधी पक्ष नेतेपदही काँग्रेसला मिळू शकणार नाही. काँग्रेसचे अवघे ५ उमेदवार विजयी झाले आहेत. सध्या सत्तेत भागीदार असलेल्या नॅशनल पीपल्स पार्टीला ७ जागा मिळाल्या आहेत. तर, अपक्षांनी १६ जागांवर विजय मिळविला आहे. नागा पीपल्स फ्रंट आणि जनता दल (युनायटेड) 2 यांनीही मणिपूरमध्ये विजय प्राप्त केला आहे. काँग्रेस हा राज्यातील थेट तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. प्रमुख विरोधी पक्षाचा दर्जाही काँग्रेसला मिळू शकलेला नाही. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे पी सरचंद्र यांचा सुमारे 18,000 मतांनी पराभव केला आहे.