नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मणिपूरमध्ये गेल्या महिनाभराहून अधिक काळ हिंसाचार सुरू आहे. आता बातम्या येत आहेत की मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग थोड्याच वेळात राज्यपालांची भेट घेणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार एन बिरेन सिंह राजीनामा देऊ शकतात. एन बिरेन सिंग दुपारी २ वाजेच्या दरम्यान राजभवनात राज्यपाल अनुसुईया उईके यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा पर्यायही केंद्राकडे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यावर केंद्र विचार करत असल्याची अटकळ बांधली जात आहे.
विशेष म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील मणिपूर दौऱ्यावर आहेत. तिथे हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या लोकांची राहुल गांधी भेट घेत आहेत. राहुल गांधी हे थोड्याच वेळात राज्यपालांची भेट घेणार आहेत. अशा परिस्थितीत राहुल गांधींच्या दौऱ्यामुळे मणिपूरमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.
प्रदीर्घ हिंसाचार
मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या अडचणीत वाढ होत आहे. राज्यातील नऊ आमदारांनीही यापूर्वी पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान मोदींना निवेदन देऊन प्रदेश नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले होते. मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने जनतेचा विश्वास गमावल्याचा दावा आमदारांनी केला होता. आदिवासी विरोधी अजेंड्याला प्रोत्साहन दिल्याचा आरोप मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्यावर आहे. यापूर्वी केंद्र सरकारने मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी शांतता समितीची स्थापना केली होती, तेव्हा त्यात समाविष्ट असलेल्या अनेकांनी एन. बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाविरोधात असंतोष व्यक्त केला होता आणि मुख्यमंत्र्यांचा शांतता समितीमध्ये समावेश करण्यास विरोध केला होता.
हिंसाचाराचे कारण
मणिपूरमधील मीतेई समुदाय आदिवासी आरक्षणाची मागणी करत आहे. याविरोधात ३ मे रोजी हिंसाचार उसळला आणि आतापर्यंत या हिंसाचारात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. या हिंसाचारामुळे हजारो लोक बेघर झाले असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर केंद्र सरकारने यापूर्वी सर्वपक्षीय बैठकही बोलावली होती. मणिपूरमधील हिंसाचारावर राजकीय पक्षही केंद्र सरकारला लक्ष्य करत आहेत. केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न करूनही राज्यात शांतता आणि सुव्यवस्था पूर्ववत होत नाही. यामुळेच मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती आणि आता मुख्यमंत्री राज्यपालांना भेटणार असताना त्यांच्या राजीनाम्याच्या शक्यतेला बळ मिळाले आहे.