इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इंफाळः मणिपूरातील जिरीबाम जिल्ह्यात कुकी बंडखोरांविरोधात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. बोरोबेक्कार सब डीव्हीजन जिरीबामच्या जकुराधोर करोंगमध्ये सुरक्षा दलाने दहा कुकी बंडखोरांचा खात्मा करण्यात आला आहे. या ऑपरेशनमध्ये ‘सीआरपीएफ’चा एक जवान जखमी झाला आहे.
मणिपूरच्या इंफाळ खोऱ्यात जातीय संघर्ष उफाळलेला आहे. येथे मूलतत्ववाद्यांनी दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. हे कुकी बंडखोर शेतात काम करणाऱ्यांवर हल्ला करीत आहेत. त्यामुळे शेतकरी प्रचंड तणावात आहेत. ते शेतात कामालाही जात नसल्याचे उघड झाले आहे. इंफाळमध्ये सोमवारी बंडखोरांनी डोंगरातून गोळीबार केला. यात शेतात काम करणारा एक शेतकरी जखमी झाला. लागोपाठ तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे बाहेरच्या ठिकाणी राहणारे शेतकरी आपल्या शेतात जायला घाबरत आहेत. त्यामुळे पिकाच्या कापणीवर परिणाम झाला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
कांगपोकली जिल्ह्यातील डोंगराळ भागातून उग्रवाद्यांनी याइंगंगपोकपी शांतिखोंगबन क्षेत्रात शेतकऱ्यांवर गोळीबार केला. यात शेतकऱ्याच्या हातावर छर्रे उडाल्याने तो जखमी झाला. याची खबर मिळताच सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी प्रत्युत्तराची कारवाई सुरू केली. बंडखोर आणि सुरक्षा दलात काही वेळ गोळीबार झाला. यात दहा बंडखोरांचा मृत्यू झाला आहे. जखमी शेतकरी याइंगंगपोकपी याला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. याआधी शनिवारी चुराचांदपुर जिल्ह्यातील डोंगर भागात बंडखोरांनी गोळीबार केला होता.