इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मणिपूरच्या कुकी-झोमी समाजाशी वांशिक संबंध असलेल्या मिझोराममधील मिझो समूदायाने विवस्त्र धिंड काढल्याचे प्रकरण चांगलेच मनावर घेतले आहे. पण त्यामुळे मिझोराममध्ये राहणाऱ्या मैतेई समाजामध्ये घबराट पसरली असून त्यांचे स्थलांतर सुरू झाले आहे.
मणीपूर सरकारने मिझोराममधील मैतेईंना आपल्या देशात आणण्याची तयारी दर्शवली असून त्यासाठी विमानांची व्यवस्था करण्यासही तयार असल्याचे म्हटले आहे. शनिवारी दुपारी काही मैतेई नागरिक मिझोरामबाहेर जात होते. त्यांच्यात खासगी कंपनीत काम करणारा एक कर्मचारी होता. तो आपल्या कुटुंबीयांसह आसामच्या कचार जिल्ह्यात खासगी वाहनाने निघाला होता. मिझोराममध्ये राहण्यात आतापर्यंत धोकादायक नव्हते, पण आता अनेक मैतेई भीतीने आपले सामान तसेच ठेवून मूळ गावी जात आहेत, असे त्याने सांगितले.
बराक खोऱ्यातील बरेच लोक रस्तेमार्गाने वाहनाने जात आहेत, तर अनेकांनी ऐझवाल विमानतळावर आश्रय घेतला आहे. मिझोरममधील पीएएमआरए (पूर्वाश्रमीची दहशतवादी संघटना- मिझो नॅशनल फ्रंट) गटाने तेथील मैतेई नागरिकांना राज्य सोडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ४१ मैतेई नागरिक मिझोरममधून आसामला आपल्या मूळ गावी पोहोचल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. वास्तविक ३ मे रोजी हिंसाचार सुरू झाल्यापासून आतापर्यंत मणिपूरमधील १२,५८४ कुकी-झोमी लोकांनी मिझोरममध्ये आश्रय घेतला आहे. मिझोरामची राजधानी ऐझवालमध्ये सुमारे दोन हजार मैतेई नागरिक आहेत. त्यामध्ये सरकारी कर्मचारी, विद्यार्थी आणि कामगारांचा समावेश आहे. त्यापैकी बहुतेक जण मूळ आसामच्या बराक खोऱ्यातील आहेत. मणिपूरमधील १२,५८४ कुकी-झोमी लोकांनी मिझोराममध्ये आश्रय घेतल्याने मैतेईंच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
दहशतवादी संघटनेने दिले निवेदन
मिझोराममधील ‘पीएएमआरए’ या संघटनेने, ‘मैतेईंनी आपल्या सुरक्षिततेसाठी मिझोराम सोडावे,’ असा इशारा देणारे निवेदन शुक्रवारी प्रसारित केले होते. त्यात, ‘मणिपूरमधील कुकी-झोमी समुदायाविरोधातील हिंसाचारामुळे मिझोराममधील झोमी समाजाच्या भावना दुखावल्या असून मैतेईंसाठी आता मणिपूरमध्ये राहणे सुरक्षित राहिलेले नाही’ असे म्हटले होते.