इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मणीपूरमधील हिंसाचारादरम्यान घडेलल्या अनेक धक्कादायक घटना आता उघडकीस येत आहे. चार दिवसांपूर्वी तीन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचे प्रकरण पुढे आल्यानंतर देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. आता आणखी एका घटनेने संताप व्यक्त होत आहे. येथील स्वातंत्र्यसैनिकाच्या वृद्ध पत्नीला जीवंत जाळल्याची घटना उघडकीस आली आहे.
मणीपूरमधील हिंसाचार हा भारताच्या इतिहासातील सर्वांत वाईट काळ ठरत आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक प्रयत्न करूनही येथील हिंसाचार थांबायचे नाव घेत नाही. घरे जाळली जात आहेत, लोकांची दिवसाढवळ्या हत्या होत आहे, महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात येत आहे. या घटनांमुळे एकूणच समाजमन सुन्न झालेले आहे. अशात ककचिंग जिल्ह्यातील सेरो या गावात स्वातंत्र्यसैनिक स्व. एस.चुरचंद सिंग यांच्या ८० वर्षीय पत्नीला घरासह जीवंत जाळल्याची घटना पुढे आली आहे. २८ मे रोजी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
एस. चुरचंद सिंग यांना माजी राष्ट्रपती एपीजे अब्दूल कलाम यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते. त्यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. २८ मे रोजी त्यांच्या पत्नी इबेतोम्बी आपल्या नातवांसह घरात होत्या. त्यावेळी एका सशस्त्र गटाने घरावर हल्ला केला. गोळीबार करून घर पेटविण्याची तयारी सुरू केली. इबेतोम्बी यांनी सर्वांत आधी आपल्या नातवांना घराच्या बाहेर पाठवले. तुम्ही सुखरूप बाहेर पडा आणि थोड्यावेळाने मला घ्यायला या, हे त्यांचे शब्द नातवांच्या कानात सतत फिरत आहेत. कारण काहीवेळाने त्यांची नात त्यांना वाचविण्यासाठी सरसावली तोपर्यंत घराने पूर्णपणे पेट घेतलेला होता. शिवाय ती पुढे जाताच तिच्यावर गोळीबार झाला. त्यात तिच्या हाताला आणि मांडीला गोळी लागली.
रात्रभर गोळीबार
मिझोराममध्ये भूमिगत मिझो नॅशनल फ्रंटची संघटना पीस एकॉर्ड एमएनएफ रिटर्निज असोसिएशनने मैतेईंना राज्य सोडण्याची धमकी दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचे पलायन सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत चुराचंदपूर आणि इम्फाळजवळ मैतेई व कुकी समुदायांमध्ये रात्रभर गोळीबार झाला. तर एका जमावाने थोरबुंग येथे शाळा आणि घरांची जाळपोळ केली.