इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळतांनाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. पण, आज त्यांनी सिन्नर येथे पत्रकार परिषद घेत राजीनामा देण्यास नकार दिला.
या पत्रकार परिषदेत कोकाटे म्हणाले की, हा इतका छोटा विषय आहे, तो इतका लांबला का ते माहित नाही. ऑनलाईन रमी हा प्रकार तुम्हाला माहित नाही का, तो खेळण्यासाठी त्याला मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट जोडावा लागतो. माझा असा कोणताही मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट ऑनलाईन रमीच्या अॅप्लीकेशनला जोडलेला नाही. कुठेही चौकशी करा, ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरु झाली आहे. तेव्हापासून मी एक रुपयाची रमी खेळलेलो नाही. किंबहुना मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे माझ्यावरील आरोप बिनबुडाचे आहे. यामुळे माझी महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे. ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला आहे. ज्यांनी माझी बदनामी केली आहे. त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय मी राहणार नाही असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
विधिमंडळाच्या व्हिडिओ बाबत बोलतांना मंत्री कोकाटे म्हणाले की, मी त्यादिवशी सभागृहात होतो, माझं काम होतं. मला माझ्या ओएसडीकडून माहिती हवी असेल तर मला एसएमएस किंवा फोन करावा लागतो. त्यासाठी मी एक मोबाईल मागवला होता. मोबाईल उघडल्यावर त्याच्यावर तो गेम आला, त्या गेमचा सारखा पॅाप – अप येतो, तो मला स्वीप करता आला नाही. तो मोबाईल माझ्यासाठी नवीन होता. मला स्वीप करायला वेळ लागला. पण, तो गेम स्वीप केल्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला नाही. तो दाखवला तो ११ सेंकदाचा आहे. ३० सेंकद गेम स्वीप करता येत नाही. तो व्हिडिओ पूर्ण दाखवला असता तर माझ्यावरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे आढळले असते.
या पत्रकार परिषदेत त्यांनी एका नव्या कृषी समृध्दी या नव्या योजनेची घोषणा केली. शेतक-यांच्या शेतांमध्ये पाच हजार कोटींची भांडवली गुंतवणूक करण्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मात्र जीआर निघणे बाकी होते, तो आज निघाला असे त्यांनी सांगितले.