इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळतांनाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काल कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. पण, त्यांनी सिन्नर येथे पत्रकार परिषद घेत राजीनामा देण्यास नकार दिला. त्यानंतर आता त्यांच्या खाते बदलाची चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्याकडे असलेले कृषी खाते हे मकरंद पाटील यांच्याकडे सोपवण्यात येऊ शकते. तर कोकाटे यांना मदत व पुनर्वसन खातं मिळू शकते. कोकाटे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या आरोपामुळे हा निर्णय होऊ शकतो.
काल पत्रकार परिषदेत कोकाटे म्हणाले की, हा इतका छोटा विषय आहे, तो इतका लांबला का ते माहित नाही. ऑनलाईन रमी हा प्रकार तुम्हाला माहित नाही का, तो खेळण्यासाठी त्याला मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट जोडावा लागतो. माझा असा कोणताही मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट ऑनलाईन रमीच्या अॅप्लीकेशनला जोडलेला नाही. कुठेही चौकशी करा, ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरु झाली आहे. तेव्हापासून मी एक रुपयाची रमी खेळलेलो नाही. किंबहुना मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे माझ्यावरील आरोप बिनबुडाचे आहे असे म्हटले होते. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी दुसरा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय..
तर दुसरीकेड सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कोकाटे कृषीमंत्री नको म्हणून पोस्ट कार्ड आंदोलन छेडले आहे. या सर्व विरोधानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने कोकाटे यांचे खातं बदलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.