नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नरचे आमदार व राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे व त्याचे बंधु सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. माणिकराव कोकाटे यांना २ वर्षाचा कारावास आणि ५० हजाराच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावल्यामुळे त्यांची आमदारकी व मंत्रीपदही धोक्यात आले आहे.
या शिक्षेबाबत मिळालेली माहिती अशी की, १९९५ ते १९९७ या काळात माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात. त्या सदनिका घेतल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी सांगितले होते की आमचे उत्पन्न कमी आहे. आम्हाला दुसरे घर नाही. त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळाल्या होत्या. त्यावेळेस माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती. आता त्याचा निकाल समोर आला आहे.
कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करत माजी मंत्री दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला होता. कोकाटे बंधुसह इतर दोघांचा आरोपीत समावेश होता. पण, कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली नाही.
लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावल्यास त्याचे सभागृह सदस्यत्व रद्द होते. पण, या शिक्षेनंतर आ. कोकाटे हे वरिष्ठ न्यायालयात जाऊ शकतात. तेथे त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळते का हे महत्त्वाचे आहे.