मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी कामगिरी करता यावी यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यात सातत्य राखण्याचे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे क्रीडा व युवक कल्याण विभागाचा पदभार घेतल्यानंतर क्रीडा मंत्री श्री. कोकाटे यांनी आढावा घेतला. यावेळी अपर मुख्य सचिव, श्री. अनिल डिग्गीकर,आयुक्त शीतल तेली-उगले, उपसचिव सुनील पांढरे, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक संजय सबनीस, उपसंचालक उदय जोशी, उपसंचालक माणिक पाटील, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अवर सचिव अशोक दमय्यावार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, शालेय स्तरावरच विविध क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी पोषक वातावरण तयार करण्यात यावे. अद्ययावत क्रीडा सुविधा, प्रशिक्षक, स्पर्धांची संधी यांची पूर्तता करावी. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच जे खेळाडू शासनाचे प्रतिनिधित्व करतात त्यांना विविध क्रीडा स्पर्धांतील यशानंतर बक्षीस प्राप्त करण्यास परवानगी देण्यासंदर्भात कार्यवाही करावी.
जास्तीत जास्त प्रशिक्षक निर्माण व्हावेत, जेणेकरून गुणवत्ताधारक खेळाडू वाढतील. प्रशिक्षकांसाठी नव्या योजना तयार कराव्यात. खेळाडूंना शासकीय नोकरीत असलेल्या आरक्षणासंदर्भात पारदर्शक प्रणाली राबविण्यासाठी समन्वयाने काम करावे, जेणेकरून खेळाडूंवर अन्याय होणार नाही. युवकांच्या कल्याणसंदर्भातील योजना राबविण्याबाबत युवकांकडून जास्तीत जास्त सूचना मागवून त्यावर सकारात्मक विचार करावा असे निर्देशही त्यांनी दिले.
राज्यात एकूण 162 क्रीडा संकुल पूर्ण असून, 138 क्रीडा संकुल प्रगतीपथावर आहेत.इतर ठिकाणी क्रीडा संकुल अद्ययावत सुविधांसह पूर्ण करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती यावेळी सादरीकरणात देण्यात आली. एकूण 8 निवासी व एक अनिवासी क्रीडा प्रबोधिनी कार्यान्वित, 17 क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते, 19 वर्षापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील प्राविण्यप्राप्त खेळाडूंची निवड करण्यात येते, सद्यस्थिती त एकूण 348 खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. क्रीडा प्रबोधिनीचे खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करणारे आहेत. तसेच युवक कल्याण उपक्रम अंतर्गत युवा पुरस्कार, युवा वसती गृह, युवा प्रशिक्षण शिबीर, युवा विकास निधी, युवा दिन व युवा सप्ताहाचे आयोजन, युवा प्रशिक्षण केंद्राची स्थापना, जिल्हास्तर युवक कल्याण, समाजसेवा शिबीर आयोजन अशा विविध योजना राबविण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.