मुंबई – श्रावण मास हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. या काळात अनेक सण-उत्सव साजरे होतात. विशेषत: महिलांसाठी नागपंचमी असो की मंगळागौर या सणासाठी विविध प्रकारचे पूजेचे साहित्य लागत असते. सहाजिकच या पूजा साहित्याची बाजारपेठ सध्या जोरात आहे. हीच बाब ओळखून आता हे सर्व पूजा साहित्य ऑनलाईन विक्रीस उपलब्ध झाले आहे. पूजा साहित्याच्या विविध वस्तू म्हणजेच बेलाची पाने, आंब्याची पाने इतकेच नव्हे तर शेणापासून तयार झालेल्या गोवऱ्या देखील या इएमआय पद्धतीने ऑनलाईन विक्री होत आहे. त्यामुळे गृहिणींना तथा सुवासिनींना या सर्व वस्तू घरबसल्या उपलब्ध होत आहेत.
घर, कार, बाईक, पर्सनल लोन, टीव्ही, फ्रीज, मोबाईल सारख्या गोष्टी आता ईएमआयवर सहज उपलब्ध होतात, पण सध्या गोवऱ्या, आंब्याची पाने, बेलाची पाने इत्यादी पूजेचे साहित्य देखील घरी बसून ईएमआयवर उपलब्ध होत आहे. खरे म्हणजे आंब्याची पाने, गोवऱ्या, बेलाची पाने आदी वस्तू एकेकाळी गावांमध्ये विनामूल्य उपलब्ध व्हायचे. आता मात्र ई-रिटेलिंग कंपनी मार्फत त्याची चक्क ऑनलाइन विक्री केली जात आहे.
नागपंचमीच्या पूजेपासून विविध प्रकारच्या सणांसाठी लागणाऱ्या वस्तू ऑनलाईन सहज मिळत आहेत. पुजेचे साहित्य खेड्यांमध्ये आजही सहजच उपलब्ध होतात. पण, शहरवासियांना त्या लवकर मिळत नाहीत. परंतु आता त्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. आपल्या मोबाईलद्वारेच तुम्ही ऑर्डर करु शकता. अॅमेझॉनसह विविध ई शॉपिंग वेबसाईटवर त्या उपलब्ध आहेत. गाईचे शेण अनेक आकर्षक पॅकमध्ये उपलब्ध आहे.
गोवऱ्यांची किंमत २१०० रुपये प्रति ५०० तुकडे असून यावर सवलत देखील आहे. आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे पेमेंट करू शकता. आपणास हवे असल्यास चक्क इएमआयवरही माल उपलब्ध आहे. गोवऱ्या विकणारे अनेक विक्रेते असून त्यात १२ पीस कँडीज १९९ रुपयांना उपलब्ध आहेत.
पूजेमध्ये वापरली जाणारी आंब्याची पाने आता ऑनलाइन विकली जात आहेत. सध्या १९९ रुपये किंमत असलेल्या या पानांवर ६० रुपयांची सूट आहे. त्यामुळे त्या ७९ रुपयांमध्ये मिळत आहेत. मात्र आपण प्राइम मेंबर नसाल आणि ऑर्डर बुक केल्याच्या दिवशी अर्जंट डिलिव्हरी हवी असेल तर १५० रुपये डिलीव्हरी चार्ज द्यावे लागेल. तर प्राइम मेंबर्ससाठी डिलिव्हरी चार्ज मोफत आहे.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ऑनलाईन खरेदीवर बँका ऑफर देखील देत आहेत. श्रावणामध्ये भगवान शंकर (महादेव) तथा शिवपूजेसाठी वापरली जाणारी बेलाची पाने ईएमआयवर देखील उपलब्ध आहेत. ४४४ रुपयांच्या एमआरपीसह बेलपत्र सध्या श्रावणाच्या निमित्ताने ३३ टक्के सूटसह २९९ रुपयांना उपलब्ध आहे. तसेच जर आपल्या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात इतर कुटुंबांसोबत पूजा साहित्य खरेदी करायचे असेल तर कोटक बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर १० टक्के सवलत आणि ईएमआय सुविधा देखील मिळवू शकता.