सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मांढरदेव ता. वाई येथे श्री काळुबाई देवीची यात्रा व दावजी बुवा यात्रा, सुरुर दि. 5 ते 7 जानेवारी 2023 या कालावधीत संपन्न होणार आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी 4 जानेवारी 2023 रोजीच्या 00.00 वाजल्या पासून ते 4 फेब्रुवारी 2023 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत या कालावधीत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 144 मधील अधिकारान्वये प्रतिबंधात्मक/बंदी आदेश तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, वाई रणजित भोसले यांनी आदेश जारी केले आहेत.
या प्रतिबंधात्मक/बंदी आदेशानुसार मांढरदेव परिसरामध्ये यात्रा कालावधीमध्ये पशुहत्या करण्यास मनाई करण्यात आली आहे. मांढरदेव परिसरात कोंबड्या, बकऱ्या, बोकड इ. प्राण्याचा बळी देण्यास, हत्या करण्यास तसेच वाहनातून यात्रेच्या ठिकाणी घेऊन जाण्यास मनाई, प्रतिबंध करण्यात आला आहे. मांढरदेव परिसरात वाद्य आणण्यास व वाजविण्यास बंदी करण्यात आलेली आहे.
मांढरदेव परिसरात तसेच देवालयाच्या परिसरात असणाऱ्या झाडांवर खिळे ठोकण्यास, लिंबू टाकणे, काळ्या बाहुल्या, बिबे, भानामती करणे, करणी करण्यास प्रतिबंध करण्यास आलेले आहे. मांढरदेव मंदिर परिसरामध्ये नारळ फोडणे, तेल वाहण्यास पूर्ण बंदी करण्यात आलेली आहे. तसेच परिसरात दारु, मद्य जवळ बाळगणे, वाहतूक करणे, विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. या आदेशाचे कोणी उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहितेच्या तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील.
Mandhardevi Yatra Tehsildar Aadesh Ban