सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतकरी एकल महिलांनी तितक्याच आत्मविश्वासाने आता पुढील आयुष्यात वाटचाल करणे महत्वाचे आहे. आपल्या मुलांना त्यांच्या आयुष्यात आनंद देण्यासाठी पुढाकार घ्या. सातारा जिल्ह्यातील घेतलेल्या आढावा बैठकीत ठरल्यानुसार आज माणदेशी फाउंडेशनने आज या महिलांना विनामूल्य बियाणे देण्याचा घेतलेला कार्यक्रम हा या महिलांचा माणुसकीवरील विश्वास अधिक दृढ करणार आहे, असे आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मत व्यक्त केले.
सातारा जिल्ह्यातील माणदेशी फाउंडेशनद्वारे म्हसवड येथे आयोजित केलेल्या माण खटाव तालुक्यातील महिलांना बियाणे वाटप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून त्या दूरदृश्य प्रणाली द्वारे बोलत होत्या.
साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, माणदेशी फाउंडेशनच्या चेतना सिन्हा, जिल्हा कृषी अधिक्षक गुरुदत्त काळे आणि एकल महिला या कार्यक्रमात उपस्थित होत्या.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, या महिलांना कायम आधार देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. उद्धवजी ठाकरे हे नेहमीच संवेदनशील आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या माध्यमातून जिल्ह्यात चांगले काम होत आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमातून एकल महिलांना त्यांच्या जीवनात चालना मिळण्यास मदत होणार आहे.