इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठी चित्रपटसृष्टीत गेले काही दिवस लग्नाची धूम सुरू आहे. हार्दिक जोशी याच्या लग्नांनंतर अनेकांच्या लग्नाचे मुहूर्त निघाले. आता ‘झी मराठी’वरील आणखी एका कलाकाराचं शुभमंगल सावधान झालं आहे. या लग्नात लग्नापेक्षा उखाण्याची चर्चा जोरात झाली आहे.
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘मन उडु उडु झालं’ या लोकप्रिय मालिकेत भूमिका साकारलेला अभिनेता ऋतुराज फडके याने नुकतीच लग्नगाठ बांधली. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि क्रिएटर प्रीती रिसबूड हिच्याशी त्याने लग्न केलं. नुकताच या दोघांचा साखरपुडा पार पडला. साखरपुड्याच्या दोन दिवसांनी ऋतुराज आणि प्रीती लग्नबंधनात अडकले. २७ जानेवारी रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला.
‘सर्वसामान्य आयुष्य जगत असताना कधीतरी प्रेम तुम्हाला परीकथेसारखे क्षण देऊन जातं’, अशी कॅप्शन देत ऋतुराजने हे फोटो पोस्ट केले आहेत. यासोबतच त्याने प्रीतीचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात ती उखाणा घेताना दिसते आहे. ‘लग्न करून माहेर सोडताना थोडंसं दु:ख जरी झालं.. ऋतुराजरावांचं नाव घेऊन मन उडु उडु झालं’ असा उखाणा प्रीतीने घेतला. प्रीतीच्या या उखाण्यावर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. या उखाण्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
या लग्नात ऋतुराजने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा परिधान केला होता. तर प्रीतीने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. ऋतुराजच्या लग्नाला मालिकेतील कलाकारही उपस्थित होते. याच मालिकेतून ऋतुराजला प्रसिद्धी मिळाली. यामध्ये त्याने खलनायकी भूमिका साकारली होती. ऋतुराजची पत्नी प्रीती ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि क्रिएटर आहे. प्रीतीचं युट्यूब चॅनल असून त्यावर ती विविध व्हिडीओ पोस्ट करते. ऋतुराजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Man Udu Udu jhala fame actor marriage