इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की एकाच व्यक्तीला एकाचवेळी कोरोना, मंकीपॉक्स आणि एचआयव्ही या तिन्ही आजारांची लागण झाली आहे. जगातील ही पहिलीच घटना असून ही व्यक्ती इटालियन आहे. घसा खवखवणे, डोकेदुखी, थकवा, ताप आणि जळजळ असा त्रास या व्यक्तीला जाणवत होता. त्यानंतर या व्यक्तीची चाचणी करण्यात आली. त्यात त्याला तिन्ही आजारांचे निदान झाले आहे. एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी तिन्ही आजारांची लागण झाल्याचे आढळून आलेले हे जगातील पहिले प्रकरण आहे.
‘जर्नल ऑफ इन्फेक्शन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात या व्यक्तीचे नाव देण्यात आलेले नाही. रिपोर्टनुसार, ती व्यक्ती ५ दिवसांच्या सहलीवर स्पेनला गेली होती आणि तिथून परतल्यानंतर ९ दिवसांनी ही सर्व लक्षणे त्याच्यामध्ये दिसू लागली. लक्षणांच्या तिसऱ्या दिवशी, त्या व्यक्तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागावर पुरळ उठले होते. घाबरलेल्या या व्यक्तीने हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात धडक मारली. त्यानंतर त्याला संसर्गजन्य रोग विभागात पाठविण्यात आले.
रिपोर्टनुसार, संक्रमित व्यक्तीच्या शरीराच्या इतर भागात तसेच गुदद्वारावर जखमा होत्या. त्यानंतर चाचणी अहवालात मंकीपॉक्स आणि एचआयव्ही संसर्गाचीही पुष्टी झाली आहे. SARS-CoV-2 जिनोमच्या अनुक्रमानुसार त्याला ओमिक्रॉनच्या उप-प्रकार BA.5.1 ची लागण झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, या व्यक्तीने फायझरच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला. कोविड १९ आणि मंकीपॉक्समधून बरे झाल्यानंतर या व्यक्तीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता एचआयव्ही संसर्गावर इलाज सुरू आहे.
Man Infected HIV Corona and Monkey Pox Rare Case
Health Same Time Detection