अहमदाबाद (गुजरात) – तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत यांच्यासह १२ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली असून जनतेमधून तीव्र दुःख व्यक्त होत आहे. मात्र जनरल बिपिन रावत यांच्या मृत्यूबाबत फेसबुक पेजवर अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी अहमदाबाद सायबर क्राईमने एका व्यक्तीला अटक करण्यात आली.
या संदर्भात अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, सदर आरोपीला दुसऱ्या धर्माचा अपमान करून धार्मिक भावना भडकवण्याच्या उद्देशाने द्वेषपूर्ण कृत्ये केल्याबद्दल आणि विविध गटांमधील शत्रुत्व वाढवल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. मात्र, त्याच्या आधीच्या कृत्यावरून त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यात अपमानास्पद शेरेबाजीही करण्यात आली होती, मात्र एक नवा शेरा समोर आल्याने हे प्रकरण समोर आले.
सायबर क्राइम सेलने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव शिवभाई राम ( वय ४४ )असून तो गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील राजुला तालुक्यातील भेराई गावचा रहिवासी आहे. तथापि, पोलीसांना दिलेल्या माहितीमध्ये जनरल रावत यांच्या विरोधात केलेल्या कथित टिप्पणीबद्दल अद्याप काहीही उघड झाले नव्हते.
या प्रकरणी सहायक पोलिस आयुक्त जितेंद्र यादव म्हणाले की, जनरल बिपिन रावत यांच्याबद्दल काही अपमानास्पद पोस्ट शेअर केल्यानंतर आरोपी आमच्या रडारवर आला. त्याची माहिती घेतल्यावर, आम्हाला कळले की, त्याने यापूर्वी हिंदू देवी-देवतांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या होत्या. त्यांनी त्यांच्या फेसबुकवरील जुन्या पोस्टमध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींबद्दल अपमानास्पद शब्दही वापरले होते. गुन्हा दाखल केल्यानंतर सायबर क्राइम सेलच्या अधिकाऱ्यांनी या आरोपीला त्याच्या मूळ गावी अमरेली येथून येथे आणले. पोलीस तपासातून समोर आले की या आरोपीला राजकीय महत्त्वाकांक्षा आहे आणि त्याला आक्षेपार्ह पोस्ट शेअर करून प्रसिद्धीझोतात यायचे आहे.