चेन्नई – दुबईहून भारतात आलेल्या एका इसमाला कस्टमच्या अधिकाऱ्यांनी ८१० ग्रॅम सोन्याची तस्करी करताना पकडले आहे. विशेष म्हणजे या चोरट्याने सुमारे ४० लाख रुपये किंमतीचे हे सोने दुबईहून चेन्नईला येताना चक्क आपल्या गुदाशयात लपवून आणल्याचे निदर्शास आले. परदेशातून भारतात अत्यंत गुप्तरितीने आणलेल्या सोन्याची खबर कस्टम अधिकाऱ्यांनी लागली. त्यामुळे त्यांनी त्या इसमाला तात्काळ अटक केली.
परदेशातून विशेषत: आखाती देशांमधून बेकायदेशीरपणे भारतात सोने आणणे काही नवीन बाब राहिलेली नाही. मागील वर्षी डिसेंबरमध्येही दुबईहून आलेल्या दोन लोकांना गुदाशयात बेकायदा सोन्याच्या बॅग लपवताना पकडण्यात आले. त्यावेळी मेन कस्टम विभागाने ७०६ ग्रॅम सोने जप्त केले होते. त्यानंतर आता पुन्हा सात महिन्यांनी अशीच घटना घडली असून कस्टम अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली आहे.
कस्टम अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या व्यक्तीने सोन्याची पेस्ट तयार करून त्याच्या चार गुठळ्या (गोळे) बांधून त्या आपल्या गुदाशयात लपविल्या होत्या. या जप्त केलेल्या ८१० ग्रॅम सोन्याचे मूल्य ४० लाख ३५ हजार रुपये असल्याचे सांगितले जाते. सीमाशुल्क नियमांनुसार, परदेशातून येणारे भारतीय पुरुष त्यांच्याबरोबर २० ग्रॅम पर्यंत सोने कोणत्याही शुल्काशिवाय देशात आणू शकतात. या सोन्याची किंमत ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावी. महिलांसाठी ही मर्यादा ४० ग्रॅम आहे, त्याची किंमत १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी. तथापि, ही सवलत केवळ दागिन्यांच्या रूपात आणलेल्या सोन्यावरच उपलब्ध आहे. परंतु परदेशातून भारतात येणारे अनेक लोक विशेषत: अनिवासी भारतीय आणि काही कामानिमित्त परदेशात गेले नागरिक किंवा पर्यटक येताना चोरट्या मार्गाने सोने आणण्याचा प्रयत्न करतात. तसेच कस्टम अधिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकतात.