विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला मोठ्या अंतराने पराभवाची धूळ चारून ममता बॅनर्जी विरोधी पक्षांच्या सर्वात प्रभावशाली नेत्या म्हणून राष्ट्रीयस्तरावर समोर आल्या आहेत. परंतु विरोधी पक्षांची मोट बांधून त्याचे नेतृत्व करण्याची त्यांची वाट बिकट असल्याचे चित्र आहे. निवडणुकांमध्ये सलग पराभावाचा सामना करणारी आणि भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येण्याच्या गोष्टी करणारी काँग्रेस ममता दीदींच्या वाटेत खोडा टाकण्याची एकही संधी सोडणार नाही. तसेच काही प्रादेशिक पक्ष ममता दीदींचे नेतृत्व स्वीकारण्यास अनुकूल नसतील. त्यामुळे त्यांच्या मार्गात अनेक अडथळे आहेत.
राजकीय समीकरणे
बंगालमध्ये निवडणुकीत भाजपच्या दोनशे जागा जिंकण्याच्या दाव्यातून हवा निघाल्यानंतर काही उत्साही प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांपासून ते राजयकीय विश्लेषकांपर्यंत सर्वांनीच ममता बॅनर्जी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षाचा चेहरा बनणार असल्याचे भविष्य वर्तविले. परंतु निवडणूक निकालाच्या उत्साहाने करण्यात आलेल्या अशा भविष्यवाण्या राष्ट्रीयस्तरावर विरोधी पर्याय आणि सर्वामान्य चेहरा बनण्याचे राजकीय समीकरणे दिसतात तितके सहज आणि सोपे नाहीयेत.
काँग्रेसकडून आव्हान
ममता बॅनर्जी यांना काँग्रेसकडूनच सर्वात प्रथम विरोध होऊ शकतो. जर ममता बॅनर्जी विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी पुढे सरसावल्या तर काँग्रेसच्या नेतृत्वाला थेट आव्हान दिल्याचे चित्र निर्माण होईल आणि ते काँग्रेसला नकोय. विरोधी पक्षांचे नेतृत्व आपल्याच हातात राहील असेच प्रयत्न काँग्रेसकडून होत राहतील. असे झाल्यास काँग्रेसचे राजकीय अस्तित्वच संपून जाईल. राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सलग पराभव होत असला तरी काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावर वाचलेले स्वरूप आणि संघटनेचा पाया यामुळेच काँग्रेसचे अस्तित्व शाबूत आहे.
काँग्रेसचे सहकार्य
विरोधी पक्षांच्या नेतृत्वाची सूत्रे काँग्रेसच्या हातातून निघून गेल्यास पक्षाची उरली सुरली राजयकीय जमीन वाचविणे अशक्य होईल. काँग्रेस ही परिस्थिती जाणून आहे. त्यामुळेच राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांच्या राजकारणात काँग्रेस ममता दीदींचे पूर्ण समर्थन करेल. पण कोणत्याही प्रादेशिक पक्षाच्या हातात नेतृत्व जावू देण्याचे प्रयत्न काँग्रेस हाणून पाडेल.
अनेक अडथळे
ममता बॅनर्जी यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चांगले संबंध आहेत. त्यामुळे दोघेही काही मोठ्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना सोबत घेऊन राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांच्या राजकारणाचे नेतृत्व कोणत्याही बिगर काँग्रेसी नेत्यांकडे देण्याबाबत काँग्रेसवर दबाव आणू शकतात. परंतु प्रादेशिक पक्षांच्या राजकीय मर्यादा आणि गरजा पाहिल्यास ही गोष्ट सोपी नाहीये.
पवारांकडून थेट मदत
शरद पवारांच्या बाबतीत पाहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रात राजकीय अस्तित्व टिकवण्याबाबत त्यांचे प्राधान्य असेल. गेल्या दोन दशकांपासून काँग्रेससोबतचे त्यांचे संबंध महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी राज्यात काँग्रेसला बाजूला करून ममता बॅनर्जी यांच्यासोबत जाणे पक्षासाठी घातक ठरेल. त्यामुळे ते थेट मदत करण्याबाबत विचारच करतील.
इतर लहान पक्ष
तामिळनाडूमध्ये द्रमुक नेते स्टालिन आणि झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांची ममता दीदींबाबत सहानुभूती असली तरी ते थेट काँग्रेसकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. हेमंत सोरेन काँग्रेसच्या सहकार्याने आघाडी सरकारचे नेतृत्व करत आहेत. तसेच स्टालिन यांनासुद्धा काँग्रेसची गरज आहे. ममता दीदींना भक्कम पाठिंबा देणारा राष्ट्रीय जनता दल बिहारच्याच राजकारणाला प्राधान्य देईल.
यांचा पाठिंबा शक्य
राष्ट्रीय स्तरावर ममता बॅनर्जी यांना विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्यासाठी समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा भक्कम पाठिंबा मिळू शकतो. या सर्व नेत्यांचे ममता दीदी यांच्याशी चांगले संबंध आहेत. तसेच राज्यांच्या राजकारणात त्यांना काँग्रेसकडून कोणताच धोका नाहीये.
एकजुटीचे प्रयत्न
राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याची संधी मिळो अथवा ना मिळो ममता बॅनर्जी विरोधी पक्षांना एकजूट करण्यासाठी आपल्या प्रयत्नांना वेग देतील. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वासह केंद्रीय तपास यंत्रणांच्या आक्रामक हल्ल्यांचा ममता दीदींनी ज्याप्रकारे सामना केला, तो पाहता त्या एकजुटीसाठी काहीच कसूर सोडणार नाहीत.