मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवस राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौर्यादरम्यान काही राजकीय आणि व्यावसायिक भेटी होणार आहेत. ममता बॅनर्जी ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या राजकारणात तिसर्या आघाडीचे प्रयत्न सुरू असल्याने या भेटीचे महत्त्व वाढले आहे. तसेच बंगालमध्ये उद्योजकांना आमंत्रित करण्यासाठी त्या विविध उद्योजक आणि व्यावसायिकांची भेट घेणार आहेत.
राजकीय भेटीकडे लक्ष
ममता बॅनर्जी यांच्या तीन दिवसांच्या दौर्यादरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राजकीय भेट महत्त्वाची मानली जात आहे. बंगाल निवडणुकीच्या काळात शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दर्शवून त्यांचा प्रचार केला होता. तसेच देशात तिसर्या आघाडीचे नेतृत्व शरद पवारांनी करावे अशी मागणी अधूनमधून उठत असते. दोन्ही पक्षांचे काँग्रेसशी फार जमत नाही. संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीवर ममता बॅनर्जी यांनी बहिष्कार टाकला होता. गेल्या आठवड्यात ममता बॅनर्जी दिल्लीत होत्या. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. परंतु सोनिया गांधी यांची भेट घेणे टाळले होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्र्यांना भेटणार?
ममता बॅनर्जी ह्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या मानेची शस्त्रक्रिया झालेली असल्याने ते सध्या रुग्णालयात आहेत. त्यामुळे त्या त्यांची भेट घेणार आहे की नाही याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. केंद्रातील मोदी सरकारला दोन वर्षांपासून विरोध करणार्यांमध्ये मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव आघाडीवर आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून दोन्ही राज्य सरकारांना नामोहरम केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
https://twitter.com/nawabmalikncp/status/1465547121826795520?s=20
उद्योजकांच्या भेटीगाठी
पुढील वर्षी एप्रिलमध्ये बंगालमध्ये बंगाल जागतिक व्यापार परिषद होणार आहे. त्यासाठी ममता बॅनर्जी विविध उद्योजक आणि व्यावसायिकांना निमंत्रित करणार आहेत. ही परिषद महत्त्वाची असल्याने त्या कोणत्या उद्योजकांची भेट घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.