नवी दिल्ली – मोदी इफेक्ट बाजूला सारत पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवणाऱ्या आणि सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता केंद्रातूनही भाजप सरकारला पायउतार करण्याचा निश्चय केला आहे. याच संदर्भात त्या सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.
पाच दिवसांच्या या दौऱ्यात ममता दीदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना भेटणार आहेत. मंगळवारी संध्याकाळी चार वाजता त्या पंतप्रधानांची भेट घेणार असून त्यानंतर कदाचित त्या पत्रकार परिषदही घेऊ शकतात, असे तृणमूलने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्यापूर्वी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेता आनंद शर्मा यांना त्या भेटणार आहेत. तर पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतरही त्यांच्या काही भेटीगाठी होणार आहेत.
दिल्लीत दाखल झाल्यापासून दीदींच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. जैन हवाला प्रकरणाचा खुलासा करणारे ज्येष्ठ पत्रकार विनीत नारायण यांची भेट त्यांनी घेतली. महिन्याभरापूर्वीच दीदींनी बंगालच्या राज्यपालांचा यात सहभाग असल्याचा आरोप केला होता.
आपल्या या पाच दिवसीय दौऱ्यात त्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अन्य विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना भेटतील. २८ जुलै रोजी संसदेत जाण्याचा त्यांचा मानस आहे. तेथेही काहीजणांशी त्यांची भेट होईल.
विरोधी पक्षनेत्यांसोबत बैठक
दिल्लीतील बंगाल भवनमध्ये २८ जुलै रोजी काही प्रमुख नेत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यात शरद पवार, पी. चिदंबरम, यांच्यासह टीआरएस, राजद, समाजवादी, आम आदमी, डीएमके आणि शिवसेनेच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देणारी आघाडी म्हणून या बैठकीकडे पाहिले जात आहे.
राज्यात भाजपला पराभूत केल्याने भाजपविरोधातील मजबूत नेतृत्त्व म्हणून ममता यांच्याकडे पाहिले जात असल्याचे त्यांच्यासोबत दिल्लीला गेलेले ज्येष्ठ नेते मुकूल रॉय यांचे म्हणणे आहे. राज्यात मोदी करिश्म्याला आव्हान देणाऱ्या ममता दीदी २०२४ च्या निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची शक्यता आहे. त्यामुळे दीदींच्या दिल्ली दौऱ्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.