इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कोलकाता बलात्कार प्रकरणी पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केल्यामुळे २७ नागरिकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे येथील स्थिती नाजूक असतांना आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्याबाबत वक्तव्य केल्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. हा राजीनामा देण्याच्या वक्तव्याचे कारण ठरले ती डॅाक्टरांसोबतची बैठक. या बैठकीला उपस्थित राहण्यास डॅाक्टरांनी नकार दिल्यामुळे ममताने आज टोकाचे वक्तव्य केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पश्चिम बंगाल सरकारने आंदोलन करत असलेल्या डॉक्टरांना मुख्यंमत्री ममता बॅनर्जी यांच्यासमवेत चर्चेचे निमंत्रण दिले होते. या बैठकीला ममता बॅनर्जी आंदोलक डॉक्टरांकडेही पोहोचल्या. मात्र, २ तासांहून अधिक वेळ त्यांनी वाट पाहूनही आंदोलक डॉक्टर त्यांच्यासोबत चर्चेला न आल्यामुळे त्यांनी स्पष्टच शब्दात भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मी पश्चिम बंगालच्या जनतेची हात जोडून माफी मागते, मी डॉक्टरांना वापस त्यांच्या कामावर रुजू करू शकले नाही. असे सांगत राजीनाम्याचे वक्तव्य केले.
यावेळी त्या म्हणाल्या की मी तीनवेळा आंदोलकांची चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण डॉक्टरांसोबत चर्चा होऊ शकली नाही. आता, यासंदर्भात जर कुठली बैठक होणार असेल तर ती राज्याचे मुख्य सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबतच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. काही लोकांना माझी खुर्ची हवी आहे, मला सत्तेची भूक नाही. मी राजीनामा द्यायला तयार आहे, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्याची भाषा केली आहे.